विद्येचे माहेरघर पुणे व उद्योग नगरी पिंपरी-चिंचवड यांच्या कुशीत वाढलेले हिंजवडी. अर्थात आजंच राजीव गांधी आयटी पार्क हिंजवडी दक्षिण बाजूला मुळा नदी व पुणे महानगरपालिकेची म्हाळुंगे हे गाव हद्द निश्चित करते. पूर्वेला वाकड व ताथवडे ही पिंपरी-चिंचवड पालिकेतील गावे आहेत. पश्चिमेकडे माण व मारूंजी ही गावे आहेत. उत्तरेकडे पिंपरी-चिंचवड पालिकेतील वाकड हे गाव आहे. तसेच पूर्व-पश्चिमेला पुणे-बंगलोर हा राष्ट्रीय महामार्ग आहे. गावचे एकून क्षेत्रफळ ८३३.१० हेक्टर इतके आहे. १९७० पूर्वी हिंजवडी, मारूंजी, कासारसाई इ. गावांची मिळून ग्रुप ग्रामपंचायत होती. त्यानंतर २५ फेब्रुवारी १९७० रोजी हिंजवडी ग्रामपंचायतीची स्थापना झाली. प्रथम सरपंच म्हणून स्व. बबनराव रामभाऊ हलावळे यांनी कार्यभार सांभाळला. सन २०११ च्या जनगणने नुसार ११,४५९ संख्या इतकी होती. तर २०२५ सालची तरंगती लोकसंख्या १,००,००० इतकी आहे. १९९९ पूर्वी शेती हा मुख्य व्यवसाय होता त्याच बरोबर लोक शेती करून नोकरी देखील करत होती. गावात आयटी पार्क आल्यानंतर व्यावसायिक इमारती मोठ्या प्रमाणावर भाडे तत्वावर देवून उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण केला आहे. त्याचबरोबर गावातील तरूणांचे व्यवसाय व उद्योग आहेत. पूर्वी पेक्षा अत्यंत कमी प्रमाणात लोक शेती करत आहेत. गावात पुणे जिल्ह्यात सर्वात मोठी पटसंख्या असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. शाळेचे १ली ते ८वी चे वर्ग असून त्यात १०१९ मुले व ९६१ मुली असे एकूण १९८० विद्यार्थी आहेत. तसेच न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ही माध्यमिक शाळा असून त्यात ५ ते १२ चे वर्ग असून ४५७ मुले व ३८४ मुली असे एकूण ८४१ विदार्थी आहेत. तसेच गावात खाजगी शाळा, महाविद्यालय देखील आहेत त्यात सिम्बायसिस, ब्लू रिज स्कूल, महिंद्रा इंटरनॅशनल स्कूल इ.आहेत. गावात एकूण ६ अंगणवाडी आहेत त्यात २०९ मुले व १८५ मुली असे एकूण ३९४ बालक आहेत. गावात आरोग्य उपकेंद्र आहेत.
गावातील जेष्ठ लोकांच्या म्हणण्यानुसार जेव्हा भगवान श्रीराम हे वनवासासाठी निघाले होते. तेव्हा त्यांचे काही काळ वास्तव्य हिंजवडीच्या परिसरात होते. १९६० च्या आसपास १५० उंबर (घर) होती. लोकसंख्या साधारणता ५०० इतकी होती. स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा मुळशी येथे टाटा कंपनीच्या माध्यमातून धरणनिर्मितीचे काम सुरु होते. त्यावेळी त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सामानाची ने आन करण्यासाठी रेल्वेचा वापर केला जात होता त्या रेल्वेचे रूळ आज देखील हिंजवडी गावात दिसून येतात. ज्यावेळी संपूर्ण भारत हा ब्रिटीश सत्तेच्या अधिपत्याखाली होता तेव्हा इंग्रज सैन्य अभ्यास करण्यासाठी जेव्हा वाकड फाटा (रक्षक चौक) येथून रणगाड्यांच्या द्वारे बॉम्ब हल्ला करत असत तेव्हा सुळकी डोंगर निशाणा ठेवून बॉम्ब वर्षाव करत तसेच बॉम्बच्या रेंजच्या दरम्यान हिंजवडी भागातील संपूर्ण लोकवस्ती म्हाळुंगे व ताथवडे येथे स्थलांतरीत करत असत. १९९९ साली जेव्हा हिंजवडीत साखर कारखाना प्रस्तावित होता (आत्ताचा संत तुकाराम सहकारी साखर कारखाना, कासारसाई) होता. त्यानंतर तो हिंजवडीच्या पश्चिमेला असलेल्या कासारसाई येथे स्थलांतरीत करण्यात आला व हिंजवडीत आयटी पार्क वसवण्याचा निर्णय घेण्यात आला व त्याला राजीव गांधी आयटी पार्क हिंजवडी असे नाव देण्यात आले. आज आयटी पार्कचा विस्तार टप्पा क्र १,२ व ३ असा आहे व तो टप्पा क्र. ११ पर्यंत प्रस्तावित आहे. हिंजवडी आयटी पार्क मध्ये पुणे व पिंपरी चिंचवड भागातून लाखो लोक रोज ये-जा करतात. आयटी पार्क हे हिंजवडीच्या अर्थव्यवस्थाचा कणा आहे. त्याच बरोबर आयटी पार्कवर आधारित छोटे-मोठे असे उद्योग आहेत.
गावात अनेक जुन्या वास्तु होत्या तसेच या वास्तु जीर्ण झाल्याने काळाच्या ओघात रस्ता रुंदीकरण व अनेक वास्तूंचे नुतनीकरण केले गेले आहे. गावात जुने कौलारू मारुती मंदिर होते. परंतु मंदिर जीर्ण झाल्याने त्याच नूतनीकरण केले गेले. गावातील ग्रामदैवत श्री म्हातोबा मंदिर, हिराई सीताई मंदिर ह्या मंदिरांचा देखील जीर्णोद्धार केला गेला.
गावात विविध देव-देवतांची मंदिरे आहे. त्यात प्रामुख्याने पंचक्रोशीचे आराध्यदैवत असलेले ग्रामदैवत श्री म्हातोबाचे मंदिर हे मंदिर हे जागृत देवस्थान आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत असणारे जेजुरी येथील खंडोबा मंदिरावर ह्या मंदिराची रचना आहे. हे मंदिर टेकवडीवर स्थित असून आजूबाजूला टेकडीवर एम.आय.डी.सी. व ग्रामपंचायतीने ह्या ठिकाणी विविध झाडांची लागवड गेली आहे. ह्या झाडीत मोर, लांडोर, विविध पक्षी येथे आढळून येतात. मंदिराचे संपूर्ण काम दगडात केले आहे. गावातील लोक व भाविक दर रविवारी मंदिरात दर्शन घेण्यासाठी येतात. सायंकाळच्या सुमारास पक्षांचा जो किलबिलाट ऐकू येतो तो आवाज मनाला एकदम प्रफुल्लीत करतो गणेश जयंतीच्या आदल्या दिवशी मंदिराचा वर्धापन दिन असतो.तर चैत्र पौर्णिमेला म्हातोबा देवाची बगाड यात्रा असते.मंदिरात दररोज नित्य पूजा होत असते, पहाटे ५.३० वा व सायंकाळी ७.१५ वा देवाची आरती होत असते.मंदिर परिसरात दत्त महाराजांचे व महादेवाचे मंदिर आहे. व मंदिर पायथ्याला म्हातोबाच्या परम भक्त व पुजारी के श्रीमती राहीबाई रामभाऊ काकडे यांचे समाधी स्थळ आहे
हिंजवडीला मोठा वारकरी सांप्रदायिक वारसा आहे. गावात जुने कौलारू मंदिर होते. त्याचा जीर्णोद्धार करून नवीन मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिरात नित्य पूजा व हरिपाठ होत असतो. दरवर्षी मंदिरात कोजागिरी पोर्णिमेनंतर काकडा आरती होत असते. राम जन्मोत्सव, कृष्ण जन्मोत्सव मंदिरात साजरा केला जातो
गावात पहिले जुने कौलारू मारुतीचे मंदिर होते. परंतु कालांतराने मंदिराचा जिर्णोधार करण्यात आला . गावठाणात हे मंदिर असून येथे सकाळी ८.०० वाजता नित्य पूजा होते. हनुमान जयंती गावात मोठ्या उत्सवात साजरी केली जाते. विशेष म्हणजे त्या दिवशी ग्रामदैवत श्री म्हातोबा देवाची बगाड यात्रा देखील असते.
मुळा नदी काठी काठी हे हिराई सीताई मातेचे मंदिर आहे. नवरात्री काळात येथे मोठा उत्सव साजरा केला जातो.
गावठाणात हे मंदिर असून नवरात्र उत्सव काळात या ठिकाणी मोठा उत्सव असतो.
वाकड रोडला हे मंदिर आहे. आकर्षक असे मंदिराचे बांधकाम केले आहे. नवरात्री काळात येथे मोठा उत्सव साजरा केला जातो.
वेताळनगर भागात हे मंदिर आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी येथे मोठा उत्सव असतो.
मुकाई नगर येथे मुकाई देवीचे मंदिर आहे, नवरात्री काळात येथे मोठा उत्सव साजरा केला जातो.
गावात विविध सार्वजनिक मंडळांची गणेश मंदिरे आहेत. गणेशोस्तव काळात मोठ्या आनंदाने गणेशोस्तव साजरा केला जातो.
दरवर्षी चैत्र पौर्णिमा व हनुमान जयंतीच्या दिवशी हिंजवडी गावची यात्रा अर्थातच उरूस असतो. या उरूसाला बगाड यात्रा असते.या यात्रेला ३५० वर्षापेक्षा अधिक वर्षांची परंपरा आहे. चैत्र पौर्णिमेच्या अगोदर १० दिवस ग्रामस्थ वाकड येथील श्री म्हातोबा मंदिरात देव बसवितात. गावातील बहुतेक ग्रामस्थांना ह्या दहा दिवस उपवास असतो. तसेच ह्या दहा दिवसात मांसाहार केला जात नाही.
यात्रेच्या ५ दिवस अगोदर म्हणजेच नवमीला वाकड येथील मंदिरात मंदिरात छबिना असतो त्या दिवशी जे लोक (शेलेकरी) लाकूड (शेल) आणण्यासाठी जाणार असतात त्यांना खाक (अंगारा) दिला जातो. दशमीच्या दिवशी सायंकाळी शेलेकरी (जे लोक लाकूड आणयला जातात त्यांना शेलेकरी म्हणतात व जे लाकूड आणले जाते त्याला शेले म्हणतात) मुळशीतील आडगाव बार्पे (घुटक) या ठिकाणी पायी जाण्यासाठी प्रस्थान करतात. मुळशीतील आडगाव बार्पे (घुटक) येथे ग्रामदैवत श्री म्हातोबाचे देवाचे मूळ ठाणे आहे. त्याठिकाणी म्हातोबा देवाला बापूजीबवा म्हणून ओळखले जाते. हिंजवडी ते मुळशीतील आडगाव बार्पे (घुटक) हे पायी अंतर साधारणत ७० ते ७५ किमी आहे. यामधील पहिला मुक्काम आजदेगाव ता. मुळशी या ठिकाणी असतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुळशी धरणातून लाँचेने (पूर्वी होडग) प्रवास करून सायंकाळी ७ च्या दरम्यान आडगाव बार्पे येथे पोहचतात. तिसन्या दिवशी पहाटे देवाला महापूजा व अभिषेक करून ग्रामस्थ बगडासाठी लागणाऱ्या लाकडाची (शेलेची) निवड करतात. त्यानंतर ते तोडून पुन्हा परतीचा प्रवास सुरू केला जातो. या मध्ये तिसऱ्या दिवशीचा रात्रीचा मुक्काम सावरगाव (ता.मुळशी) येथे असतो. त्यांनतर चौथ्या दिवशी रात्री दहाच्या सुमारास शेले व शेलेकरी गावात पोहोचतात. त्यानंतर सकाळपासून गावातील सुतार यांच्या द्वारे ग्रामस्थ बगाड तयार करतात. मुख्य यात्रेच्या दिवशी म्हणजेच चैत्र पोर्णिमा व हनुमान जयंती दिवशी पहाटे हनुमानाचा अभिषेक केला जातो. त्यानंतर ग्रामस्थ ज्या व्यक्तीला गळ टोचला जाणार आहे अश्या व्यक्तीची निवड गळकरी म्हणून निवड करतात. गळकरी हा जांभुळकर कुटुंबातून निवडला जातो. सोबत खांदेकरी देखील निवडले जातात. साखरे कुटुंबातील व्यक्तीची निवड खांदेकरी म्हणून होते. तसेच हुलावळे कुटुंबाला काठीचा मान असतो.
सायंकाळी ४.३० ला बगाड सुरुवात होते. सायंकाळी काळी ४.३० ला बगाड कार्यक्रमाला सुरुवात होते, सायंकाळी ५.३० वाजता होळीच्या पायथ्याला गळकरी यांना गळ टोचला जातो. साखरे कुटुंबातील व सुतार कुटुंबातील व्यक्ती हा गळ टोचतात.
त्यानंतर बगाडावर बसून बगाड वाकडच्यादिशेने मार्गस्थ होते, वाकड येथे प्रथम गळकरी व देवांची गळाभेट होते. त्यानंतर वाकड येथील म्हातोबा मंदिरात दर्शन झाल्यानंतर गळ काढला जातो. हि बगाड यात्रा पाहण्यासाठी लाखो लोक लांबून येतात.आयटी पार्क सारखा परिसर असताना देखील इतक्या वर्षांची परंपरा हिंजवडीतील लोक अजूनदेखील जपून आहेत व हि बाब सर्व हिंजवडीकर नागरिकांसाठी अभिमानस्पद अशी आहे.
नवीनतम ग्रामपंचायत हिंजवडी बातम्या, लेख आणि संसाधने, दर महिन्याला थेट तुमच्या इनबॉक्समध्ये पाठवली जातात.





